शिरूरमध्ये तरुणावर गोळीबार; घटनास्थळीच मृत्यू; पोलीस तपास सुरू

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून, या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

शिरूर शहरातील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुचाकीवरून जात असलेल्या या तरुणाला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोर कोण होते, हत्येमागचे नेमके कारण काय आणि या घटनेचा पूर्ववैमनस्याशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शिरूर शहरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

या हत्येप्रकरणी अधिकृत तपशील समोर येताच आम्ही तुम्हाला तात्काळ माहिती देऊ.