पुरंदर तालुक्यात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा मृत्यू

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पिसे गावात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. हलका पाऊस सुरू असताना अचानक जोरदार वीज कडाडली आणि मोहन दादा मुळीक यांच्या शेतात ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हातारो सोनबा ठोंबरे हे आपल्या बकऱ्या घेऊन शेतात चारत होते. त्यावेळी अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या सहा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा सुदैवाने या दुर्घटनेतून बचावला.

या घटनेमुळे ठोंबरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी तसेच पशुपालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज चमकत असताना मोकळ्या शेतात, झाडाखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबणे टाळून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.