मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
निंबूत-बारामती : पुरंदर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या कोळेवस्ती परिसरात एका शेतकऱ्याच्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. विद्युत तारांमधून ठिणग्या पडल्याने ऊसाला आग लागल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे.
या दोन एकर ऊसासाठी आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. “आयुष्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली. मोठ्या कष्टाने उभा केलेला ऊस डोळ्यांसमोर जळून खाक झाला,” अशी भावना व्यक्त करताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
दरम्यान, जळीत क्षेत्राची पाहणी करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याचे संचालक घटनास्थळी आले. मात्र सध्या कारखाना बंद असल्याने जळालेला ऊस कारखान्याला घेऊन जाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या नुकसानीची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना सोमेश्वर कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांबाबत महावितरणला यापूर्वीच अनेकदा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र तारांबाबत योग्य उपाययोजना न झाल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला.
“लाखो रुपये खर्च करून शेतकरी पीक उभं करतो आणि त्याची अशा पद्धतीने राखरांगोळी होते. मग शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २५ तारखेपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांचा धरणे मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर नेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे दोन एकर ऊसाचे मोठे नुकसान झाले असून, जळालेल्या ऊसाची नुकसानभरपाई कोण देणार? तसेच महावितरणकडून विद्युत तारांबाबत ठोस उपाययोजना कधी होणार? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
