शिक्षण,आरक्षण,नोकरी व पेन्शन हक्कांसाठी पुण्यात राज्यस्तरीय महाआंदोलन; ५ जुलै रोजी शिक्षक-कर्मचारी संघटनांचा एल्गार

मेकिंग महाराष्ट्र.पुणे,प्रतिनिधी : शिक्षण, आरक्षण, नोकरी आणि पेन्शन हक्कांच्या संरक्षणासाठी राज्यभरातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत ५ जुलै २०२६ रोजी पुण्यात राज्यस्तरीय महाआंदोलन आणि शिक्षण परिषद आयोजित केली आहे.राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (प्रोटान) आणि भारत मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन होत असून, शिक्षणाचे खासगीकरण, कंत्राटी भरती, जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, अनुदानित संस्थांचे प्रश्न तसेच अंगणवाडी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला आहे.आंदोलनाअंतर्गत पुणे येथील शिक्षण आयुक्त व उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे दुसरी राज्यस्तरीय शिक्षण परिषद पार पडणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम करणार आहेत. कार्यक्रमात विविध शिक्षक संघटना, कर्मचारी संघटना, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राज्यभरातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत.आंदोलनकर्त्यांनी खासगीकरणविरोधी धोरणे रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती करणे, अनुदानित संस्थांचे प्रश्न सोडवणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.राज्यभरातील शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.