मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
सातारा : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्सव साजरे करताना आनंद आणि उत्साहासोबतच ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळे, दहीहंडी उत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी DJ आणि डॉल्बी साउंड सिस्टीममधील फरक सोप्या भाषेत समजावून सांगितला. उत्सवाच्या काळात आवाजाची तीव्रता वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साउंड सिस्टीम आणि त्यांच्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.
“DJ आणि डॉल्बी साउंड सिस्टीम यांचा वापर करताना केवळ आवाज मोठा करणे हा उद्देश नसावा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, ध्वनीची मर्यादा आणि आजूबाजूच्या नागरिकांचा विचार करणे गरजेचे आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
सध्या वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे वातावरणावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उत्सव हे आनंदाचे आणि सामाजिक एकोप्याचे माध्यम आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करताना कायद्याचे पालन करण्यासोबतच इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यांना केले.
पिंगळे यांच्या या मार्गदर्शनामुळे बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये DJ, डॉल्बी आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली.
