इंदापूर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची विविध विषयांवर रोखठोक भूमिका

बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीपासून मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत व्यक्त केले मत; ‘ऑपरेशन टायगर’बाबत म्हणाले—गोगावले साहेबांनाच विचारा

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

इंदापूर : राज्यातील पावसाने घेतलेल्या ओढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना याबाबत धोरण ठरवावे लागेल, अशी भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे व्यक्त केली.

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याबाबत भरणेंची प्रतिक्रिया.

बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.

यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, ठाणे आणि कोकणचा भाग वगळता राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लवकरात लवकर पाऊस पडावा, यासाठी परमेश्वराला साकडे घालत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘कोरडा दुष्काळ जाहीर केला पाहिजे का?’

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत कृषिमंत्री म्हणून तुमचे मत काय, असा प्रश्न विचारला असता भरणे म्हणाले, “पावसाची वाट आपल्याला पाहावी लागेल. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पिके गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत धोरण ठरवावे लागेल.”
खासदार संजय देशमुख यांच्यावर धक्काबुक्कीच्या आरोपाबाबत
खासदार संजय देशमुख यांच्याकडून शेतकऱ्याला धक्काबुक्की झाल्याच्या चर्चेबाबत विचारले असता भरणे यांनी या घटनेची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

“संजय देशमुख हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. धक्काबुक्की झाल्याची मला माहिती नाही. मात्र देशमुख साहेब असे कधीच करणार नाहीत. ते जनतेतील लोकप्रतिनिधी आहेत,” असे भरणे म्हणाले.

सुषमा अंधारे यांच्या ‘हप्तेखोर-कमिशनखोर सरकार’ आरोपावर भरणेंचे सावध उत्तर
सुषमा अंधारे यांनी सरकारवर हप्तेखोरी आणि कमिशनखोरीचे आरोप केल्याबाबत विचारले असता भरणे म्हणाले, “अंधारे ताई काय बोलल्या, हे मला माहिती नाही. त्या असे बोलल्या आहेत का, याची माहिती घेऊन मी उत्तर देईन.”

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भरणेंचे आवाहन
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भूमिका मांडली. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी हा प्रश्न सर्वांनी एकत्रित येऊन सोडवण्याची गरज व्यक्त केली.

“कोणतेही आरक्षण देताना इतर आरक्षणधारकांवर अन्याय होता कामा नये.
गैरसमज निर्माण न करता एकमेकांना विश्वासात घेऊन आरक्षणाचा विषय चर्चेने सोडवला पाहिजे,” असे भरणे म्हणाले.,,

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेबाबत

ओबीसींच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी भूमिका व्यक्त करत भरणे म्हणाले, “कोणीही यात राजकारण करू नये. समाजातील गोरगरिबांना न्याय कसा मिळेल, ही भूमिका असली पाहिजे.”

ऑपरेशन टायगर’बाबत भरणेंनी हात झटकले
उपमुख्यमंत्री ‘ऑपरेशन टायगर’ करणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सूतोवाच केल्याच्या चर्चेबाबत विचारले असता भरणे यांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.

“ऑपरेशन टायगर करणार की नाही,
याची मला कल्पना नाही. याबाबत गोगावले साहेबांनाच अधिक विचारले तर बरं होईल,” असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.एकूणच, पावसाची प्रतीक्षा, संभाव्य दुष्काळ, आरक्षणाचा संवेदनशील प्रश्न आणि राजकीय घडामोडी अशा विविध मुद्द्यांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.