मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
इंदापूर : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. जंक्शन, ता. इंदापूर, जि. पुणे येथील ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख हा नीलमणी मंगल कार्यालयाजवळ गावठी पिस्तूल जवळ बाळगून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सदर ठिकाणी सापळा रचला. संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी पोलीस अमलदार तुषार चव्हाण (बक्कल क्र. २७५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोलीस अमलदार गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वालचंदनगर परिसरात अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
