वडगाव-निंबाळकर ग्रामपंचायतीविरोधात आमरण उपोषण,गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव-निंबाळकर ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या गायकवाड कुटुंबाच्या आमरण उपोषणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे.

शासकीय घरकुलासाठी असलेल्या निवासी जागेवर बोगस नोंद करून अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते निलेश गायकवाड यांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे, मिळकत क्रमांक ८९७ संदर्भातील नोंदी आणि ठरावाच्या क्रमांकाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

या जागेची नोंद संबंधित व्यक्तीच्या नावावर भोगवटादार म्हणून करण्यात आली असून, त्यासाठी मूळ ठराव किंवा अधिकृत खरेदीखत उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतिक्रमणाबाबत नोटीस देऊनही कारवाई झाली नसल्याचाही दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.

कथित बोगस नोंद रद्द करून जागेचा हक्क मिळावा, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांची होती.

दरम्यान, बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. या आमरण उपोषणाला बारामती टकारी समाजाच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला होता.

आता प्रशासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता कधी आणि कशी होते, याकडे उपोषणकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.