डीजेचा आवाज मर्यादेतच हवा, गणपती मंडळांना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांचे आवाहन
मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती: गणपती उत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठका घेऊन कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
डीजे आणि मोठ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी केले आहे. नवजात बालक, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून नॉईज पॉल्युशन टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गणेश मंडळांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावे, महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, तसेच सायबर फसवणूक आणि ड्रग्सविरोधात जनजागृती करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, बारामती शहरात गणेश मंडळांच्या परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टमची व्यवस्था करण्यात आली असून, उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
