बारामती : बारामती तालुका पोलिसांनी चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीकडून हस्तगत केलेले सोन्याचे मंगळसूत्र फिर्यादी महिलेस परत केले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दिनांक ०४/०८/२०२६ रोजी फिर्यादी अनुराधा संतोष पागळे (वय ३४ वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दिनांक ०५/०८/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५५ वाजण्याच्या सुमारास त्या मौजे कन्हेरी, ता. बारामती येथून जळोचीकडे मोटारसायकलवरून जात होत्या.
कन्हेरी गावच्या हद्दीत लाकडी जळोची रोडवर बटरफ्लाय गार्डनच्या पुढे त्यांच्या पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना थांबवून गाडीवर पाठिमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे दोन डोरे असलेले फॅन्सी मंगळसूत्र, अंदाजे किंमत १,९०,००० रुपये, जबरदस्तीने ओढून चोरी करून नेले होते.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दिनांक ०५/०८/२०२६ रोजी रात्री ९.२७ वाजता गु.र.जि. नंबर १५४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी केला. तपासादरम्यान आरोपी गणेश मंगेश काळे (वय २२ वर्षे, रा. कुळधरन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला तात्काळ अटक करून त्याच्याकडून फिर्यादीच्या वर्णनातील १३ ग्रॅम वजनाचे दोन डोरे असलेले फॅन्सी मंगळसूत्र, *अंदाजे किंमत १,९०,००० रुपये, हस्तगत करण्यात आले.
सदरचे मंगळसूत्र दिनांक ३१/०८/२०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०६(३) प्रमाणे फिर्यादीस परत देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे तसेच मुद्देमाल कारकून भारती खंडागळे, म.पो.हवा./ब.नं. १२०० यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
