बारामती तालुक्यातील करंजे येथील ३१ वर्षीय संगीता काळे यांचा डोंबिवलीत मृत्यू; मानसिक व शारीरिक छळाचा नातेवाइकांचा आरोप
मेकिंग महाराष्ट्र- चेतन शिंदे
बारामती : पारधी समाजातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या बारामती तालुक्यातील ३१ वर्षीय महिला पोलिसाच्या दुर्दैवी मृत्यूने करंजे, सुपे आणि बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात ही घटना घडली. पतीकडून कथित मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१, रा. करंजे, ता. बारामती) असे मृत महिला पोलिसाचे नाव आहे. संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे असून, सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर ती पतीसोबत डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होती.
पतीकडून मानसिक व शारीरिक छळाचा आरोप
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संगीताच्या सावळ्या वर्णावरून पतीकडून तिला अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घातले जात होते आणि मारहाणही केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातील वस्तूंची खरेदी, खर्च तसेच अन्य कौटुंबिक कारणांवरूनही पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या सततच्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून संगीताने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पतीविरोधात गुन्हा दाखल; अटक
संगीताच्या मृत्यूस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संगीताच्या सासरच्या इतर सदस्यांकडूनही आर्थिक मागणीसह सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित इतर व्यक्तींची भूमिका तपासून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.
संघर्षातून पोलीस दलात मिळवले स्थान
संगीताने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले होते. शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर तिने पोलीस दलात स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे पारधी समाजातील अनेक मुला-मुलींमध्ये शिक्षण घेऊन सरकारी सेवेत जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता.
संगीताकडे परिसरातील अनेक मुली आदर्श म्हणून पाहत होत्या. तिच्या संघर्षाची आणि यशाची प्रेरणा घेत अनेक मुलींनी पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहिले. त्यामुळे संगीताचे निधन हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर तिला आदर्श मानणाऱ्या अनेकांसाठी मोठा धक्का ठरले आहे.
प्रेरणादायी प्रवासाचा दुर्दैवी शेवट
अडचणींवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संगीताच्या आयुष्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने करंजे, सुपे आणि बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
