मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : बारामती सहयोग सोसायटी येथे आयोजित जनता दरबाराच्या वेळी इतिहास व भूगोल शिक्षक, लेखक आणि दुर्गअभ्यासक श्री. सुहास देशमुख यांच्या ‘शिकू शब्दकोड्यांमधून शिवइतिहास’ या पुस्तकाचे सहयोग निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणादायी गाथा आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आजच्या काळाची गरज आहे.
विशेषतः लहान मुलांना इतिहास केवळ पाठ्यपुस्तकातून न शिकवता तो सहज, रंजक आणि खेळकर पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
शब्दकोडी, चित्रकोडी, अंककोडी तसेच बहुपर्यायी प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची निर्मिती आणि महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा अभ्यास मनोरंजक पद्धतीने करता येणार आहे.
इतिहासाची गोडी लहान वयातच निर्माण व्हावी आणि आपल्या मातीतल्या शौर्य, पराक्रम व स्वराज्याच्या विचारांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने सुहास देशमुख यांनी हा अभिनव उपक्रम साकारला आहे.
यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री. सुहास देशमुख यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. शिवचरित्र आणि स्वराज्याचा इतिहास अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांनी देशमुख यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
शिवइतिहासाला अभ्यासासोबतच खेळकरपणाची जोड देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
