सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो गायब! सतीश काकडेंची टीका…

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अहवालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो वगळल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यावरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी कारखाना प्रशासनावर टीका केली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचा फोटो नसल्याचे समोर आल्यानंतर सतीश काकडे यांनी यावर भाष्य करताना कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांवर निशाणा साधला.

“कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल, किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला सतीश काकडे यांनी लगावला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, अहवालातून फोटो वगळण्यामागचे नेमके कारण काय? हा निर्णय जाणूनबुजून घेण्यात आला की त्यामागे अन्य काही कारण आहे? याबाबत कारखाना प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातील फोटोवरून सुरू झालेली ही चर्चा आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.