कै. वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी ट्रस्टचा निर्णय; यंदा जल्लोषाऐवजी श्रद्धांजली

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे बारामती शहरातील कै. वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी ट्रस्ट यांच्यावतीने यंदाचा दहीहंडी फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे.बारामती शहरातील भिगवन चौक येथे दरवर्षी उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखद वातावरणाचा विचार करून दहीहंडी फेस्टिवल न करण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रद्धांजली संदेशामध्ये, “आपले लोकप्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे यावर्षीचा दहीहंडी फेस्टिवल रद्द करण्यात येत आहे,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.अजितदादा पवार यांचे बारामतीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या निधनाने बारामतीकरांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा दुःखद प्रसंगी उत्सवी कार्यक्रमाला विराम देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा निर्णय तालीम ट्रस्टने घेतला आहे.दरम्यान, कै. वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. ऋतुराज अर्जुनराव काळे तर उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर कृष्णराव काळे आहेत. ट्रस्टचे सभासद तसेच सर्व देणगीदारांच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.बारामतीतील दहीहंडी उत्सवाला दरवर्षी मोठी गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतो. मात्र यंदा अजितदादांच्या निधनाच्या दुःखामुळे हा उत्सव रद्द करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
