
- मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे बारामती : आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर घरातून निघून गेलेल्या अवनीचा दुसऱ्याच दिवशी घराशेजारी मृतदेह आढळून आल्याने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रुई परिसरातील साईनगर येथे रविवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. मुलीच्या अंगावर जखमा असून हात-पाय मोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी रात्री अवनीचा मोबाईलच्या वापरावरून किंवा अन्य किरकोळ कारणावरून तिच्या आईसोबत वाद झाला होता. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.
त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.दरम्यान, रविवारी सकाळी साईनगर परिसरात तिच्या घराशेजारीच तिचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्या शरीरावर जखमा असल्याचे तसेच हात-पाय मोडल्याचे दिसून आले आहे.
घटनास्थळाशेजारील एका इमारतीच्या टेरेसवर तिच्या चपला आढळून आल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.आत्महत्या, अपघाती घसरण की हत्या?या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सध्या आत्महत्या, इमारतीवरून अपघाती घसरण किंवा हत्या अशा सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहाची अवस्था आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.अवनीकडे स्वतःचा मोबाईल फोन नसल्याचे समोर आले आहे.
ती तिच्या आईच्या मोबाईलवरून चॅटिंग करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे तिच्या मोबाईलवरील चॅटिंग, कॉल डिटेल्स आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच एका संशयित मुलाच्या मोबाईलचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. या तपासातून अवनीच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि तिच्या शेवटच्या हालचालींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणारमृतदेह बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आणि वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार यांनी रुग्णालयात तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि सर्व बाजूंनी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ती इमारतीच्या टेरेसवर कशी पोहोचली आणि तिच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे का, या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहेत.
टीप : या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आत्महत्या, अपघात किंवा हत्या यापैकी कोणताही निष्कर्ष तपास पूर्ण होण्यापूर्वी काढणे योग्य ठरणार नाही.
