तांदुळवाडीत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; मुलाचा गळफास, आईच्या गळ्यावर व्रण, मृत्यूचे गूढ कायम

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे .पुणे : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) माय-लेकाचा दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय मुलाने घरातील अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर त्याची ४१ वर्षीय आई घरातील खिडकीजवळ मृतावस्थेत आढळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घराचा दरवाजा आतून बंद; वडिलांना संशयपोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरधनी विजय रामदास गावडे हे गुरुवारी (२० ऑगस्ट) रात्री रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी काम संपल्यानंतर ते नेहमीप्रमाणे तांदुळवाडी येथील घरी परतले.घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावून पत्नी रमा गावडे आणि मुलगा विवेक यांना आवाज दिला. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर विजय गावडे यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला.त्यांनी तातडीने शेजारी राहणारे सुरज भिमराव शिंदे यांना मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून घराचा दरवाजा उघडला असता त्यांना धक्कादायक दृश्य दिसून आले.मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत; आई खिडकीजवळ मृतघरातील एका खोलीत १७ वर्षीय विवेक विजय गावडे हा अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच खोलीत त्याची आई रमा विजय गावडे (वय ४१) या खिडकीजवळ पाठीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या.विजय गावडे यांनी पत्नीला उठवण्याचा आणि हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झाली नाही. तसेच रमा गावडे यांच्या गळ्यावर काळसर रंगाचे व्रण दिसून आल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.दोघांनाही रुग्णालयात नेले; डॉक्टरांनी मृत घोषित केलेघटनेची माहिती मिळताच कुटुंबातील नातेवाईक हनुमंत वायसे यांनी बारामती शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.नातेवाईक आणि पोलिसांच्या मदतीने रमा गावडे आणि विवेक गावडे यांना बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.आत्महत्या की हत्या? पोलिसांचा सर्व बाजूंनी तपासया घटनेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विवेकने गळफास का घेतला आणि रमा गावडे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला?रमा गावडे यांच्या गळ्यावर आढळलेल्या काळसर व्रणांमुळे पोलिसांकडून या घटनेची विविध शक्यता तपासण्यात येत आहे. ही हत्या आहे की आत्महत्येशी संबंधित घटना, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलीला आहे, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू असून तपासात कोणतीही कसूर किंवा दिरंगाई केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.माय-लेकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *