तक्रारदार व पत्नीविरुद्ध कारवाई न करण्यासाठी ७ लाखांची मागणी होती रक्कम, “यापूर्वी २ लाख स्वीकारल्याचा आरोप..
मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती | प्रतिनिधी : बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. महेश अंकुश उगले (वय ३६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. बारामती शहरातील माळेगाव रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार महेश उगले यांनी एकूण ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी यापूर्वी २ लाख रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, उर्वरित ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
या लाच मागणीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी बारामती येथील माळेगाव रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार महेश अंकुश उगले याला ACBच्या पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ACBच्या कारवाईने बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.
