बारामती तालुका पोलिसांची कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह २२ वर्षीय तरुण ताब्यात.!

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत एका २२ वर्षीय तरुणाला बेकायदा गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ही कारवाई ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वंजारवाडी हद्दीत हॉटेल जगदंबाजवळ, बारामती-भिगवण रोडलगत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यदेव भिमसेन वर्मा (वय २२, सध्या रा. ऐश्वर्या बेकरीजवळ, सूर्यनगरी, बारामती; मूळ रा. हत्याबाद, ता. आग्रा, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) हा संशयितरित्या बेकायदा हत्यार जवळ बाळगताना आढळून आला.

त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्टल, मॅग्झीनसह, तसेच २०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेल्या काडतुसावर इंग्रजीमध्ये “KF 7.65” असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४२५/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार महेश अंकुश उगले (बकल नं. २६३७) यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपासही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई मपोहेवा मोटे (बकल नं. २५९७) यांनी केली.