मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : बारामती शहरातील नक्षत्र गार्डन येथे उभारण्यात येत असलेल्या तथागत गौतम बुद्ध प्रेरणा स्थळाच्या डोमची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली.
या पाहणीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष माहिती घेतली तसेच संबंधित अधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना आणि मानवतेच्या संदेशाला समर्पित असलेले हे प्रेरणा स्थळ बारामतीच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भगवान गौतम बुद्धांच्या शांतता, समता, करुणा आणि बंधुभावाच्या विचारांची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाहणीदरम्यान डोमची रचना, सुरू असलेले बांधकाम तसेच परिसरातील विविध विकासकामांची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. कामाची गुणवत्ता आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.
बारामती शहराच्या विकासासोबतच सामाजिक आणि वैचारिक प्रेरणा देणारी स्थळे निर्माण होणे महत्त्वाचे आहे. तथागत गौतम बुद्धांचे विचार समाजाला शांतता, समता आणि मानवतेचा मार्ग दाखवतात, या भावनेतून हे प्रेरणा स्थळ नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्षत्र गार्डनमधील हे तथागत गौतम बुद्ध प्रेरणा स्थळ पूर्ण झाल्यानंतर बारामतीकरांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आणि प्रेरणास्थान ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
