ॲड. कांचनकन्होजा खरात यांची शासनाकडे मागणी; टीआर-एनटी वाहनांमध्ये भेदभाव न करण्याची भूमिका
चेतन शिंदे – मेकिंग महाराष्ट्र
फलटण, दि. ९ सप्टेंबर २०२६ : फलटण एस.टी. स्टँड हे मध्यबिंदू मानून त्यापासून ६० किलोमीटरच्या परिसरातील सर्व विद्यमान तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या संबंधित टोल प्लाझांवर फलटण तालुक्यातील वाहनांसाठी विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
फलटण हे सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. फलटण-पंढरपूर, फलटण-पुणे/जेजुरी, फलटण-इंदापूर/बारामती, फलटण-दहिवडी तसेच फलटण-लोणंद-शिरवळ या विविध दिशांनी रस्त्यांचे जाळे विकसित होत आहे. या पायाभूत सुविधांचा फायदा केवळ फलटण तालुक्यालाच नव्हे, तर सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या वाहतूक व्यवस्थेला होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र या रस्त्यांच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांनी बांधकामाच्या काळात अनेक वर्षे वाहतूक कोंडी, धूळ, अपघात, वाहनांचे नुकसान आणि अन्य अडचणींचा सामना केला आहे. काही ठिकाणी अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. आता रस्ते विकसित होत असताना स्थानिक नागरिकांनाच विविध दिशांनी प्रवास करताना टोलचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने विशेष स्थानिक सवलतीची आवश्यकता असल्याचे खरात यांनी म्हटले आहे.
सध्याच्या व्यवस्थेत टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरातील स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र पासाची तरतूद आहे. मात्र विस्तीर्ण फलटण तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक टोलसाठी स्वतंत्र २० किलोमीटरची मर्यादा अपुरी ठरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
५०० ते ६०० रुपयांत वार्षिक पासची मागणी
फलटण तालुक्यातील पात्र वाहनधारकांसाठी विशेष स्थानिक वार्षिक एकत्रित टोल पास सुरू करून त्याची वार्षिक फी ५०० ते ६०० रुपयांपेक्षा अधिक नसावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच वाहन ट्रान्सपोर्ट (TR) किंवा नॉन-ट्रान्सपोर्ट (NT) आहे, या आधारावर स्थानिक वाहनधारकांमध्ये भेदभाव करू नये, अशीही मागणी आहे.
हा पास एका फास्टटॅग अथवा डिजिटल प्रणालीशी जोडण्यात यावा आणि ६० किलोमीटरच्या परिघातील संबंधित सर्व टोल प्लाझांवर सवलत आपोआप लागू व्हावी. भविष्यात या परिघात नवीन टोल प्लाझा सुरू झाल्यास त्याचाही या योजनेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी फलटण तालुक्यातील रहिवासी आणि वाहनांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि ऑनलाइन असावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही मागणी राष्ट्रीय महामार्गावरील सर्वसाधारण टोल धोरणाला विरोध करण्यासाठी नसून, राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या आणि त्याचा आर्थिक भार सहन करणाऱ्या स्थानिक नागरिकांना न्याय्य व परवडणारी सवलत मिळावी, या सार्वजनिक हिताच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी म्हटले आहे.
“राष्ट्रीय महामार्गांचा विकास — स्थानिक नागरिकांवर आर्थिक अन्याय नको” या भूमिकेचा विचार करून फलटण तालुक्यासाठी स्वतंत्र ६० किलोमीटर स्थानिक परिघ निश्चित करून ५०० ते ६०० रुपये वार्षिक दराचा एकत्रित टोल पास लागू करण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच खासदार व आमदारांनी हा प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत प्रभावीपणे मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
