सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ठाकरे गटाची एन्ट्री; सर्व गटांत उमेदवार देण्याची तयारी

गट क्रमांक ३ मधून हनुमंत भापकर यांचा प्राथमिक उमेदवारी अर्ज दाखल; ‘ब’ वर्गासह सर्व जागांवर पॅनल उभे करण्याची रणनीती

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना आता या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने अधिकृतपणे एन्ट्री केली आहे. कारखाना निवडणुकीत ठाकरे गटाकडून स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी सुरू असून, सर्व गटांमध्ये उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर गट क्रमांक ३ मधून हनुमंत भापकर यांनी प्राथमिक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट झाली असून, आगामी काळात निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून येत्या दोन दिवसांत कारखान्याच्या पाचही गटांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ काही जागांवर उमेदवार न देता ‘ब’ वर्गासह कारखान्याच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ठाकरे गटाचे संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. हनुमंत भापकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याने या तयारीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

आगामी दोन दिवसांत पाचही गटांमधून उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या पॅनलचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीत आता ठाकरे गटाची एन्ट्री झाल्याने निवडणुकीतील राजकीय चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाकडून संपूर्ण पॅनल उभे करण्याच्या निर्णयामुळे कारखाना निवडणुकीतील विविध गटांची समीकरणे कशी बदलतात, याकडे सभासद आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.