अनैसर्गिक संबंधासाठी जबरदस्तीसह शारीरिक व मानसिक छळ केल्याचा वडिलांचा आरोप; रूई येथील घटना
चेतन शिंदे – मेकिंग महाराष्ट्र
बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूई येथे १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह सासूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती व सासूने मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा तसेच पतीने तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव सुजल माऊली ननवरे (वय १९ वर्षे २ महिने, रा. रूई, ता. बारामती) असे आहे. या प्रकरणी तिचे पती माऊली नामदेव ननवरे (रा. रूई) आणि सासू बायडाबाई नामदेव ननवरे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत सुजल ही तिच्या सासरी नांदत असताना तिचा पती व सासू यांनी तिचा कथितरित्या शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पतीने तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याने तिचे जगणे असह्य झाले आणि त्यातून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिचे वडील दिपक हरिभाऊ रासकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
९ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपूर्वी रूई येथील राहत्या घरी ही घटना घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार भोसले यांनी केली असून, पोलीस निरीक्षक पवार हे प्रभारी अधिकारी आहेत.
दरम्यान, या घटनेमागील नेमकी परिस्थिती, विवाहितेच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर झालेला कथित छळ आणि इतर संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपींवरील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होणार आहे.
