बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीचा टेरेसवरून पडून मृत्यू; अभ्यासाच्या ताणाची पालकांकडून प्राथमिक माहिती.!

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून 16 वर्षीय विद्यार्थिनीने उडी घेतल्याची धक्कादायक घटना 4 सप्टेंबर रोजी पहाटे घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

मृत विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पोलिसांना पालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास आणि परीक्षेच्या तणावाबाबत बोलत होती. अभ्यास होत नसल्याने तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे ती आई-वडिलांना सांगत असल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 12.30 वाजेपर्यंत विद्यार्थिनी अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी टेरेसवर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी आवाज दिल्यानंतर तिने अचानक खाली उडी घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

इमारतीच्या समोरील भागात खाली पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. आई-वडील आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काही काळ ती शुद्धीवर होती आणि तिने आईकडे पाणी मागितल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची माहिती पालकांनी दिली असली, तरी विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या आई-वडिलांनी किंवा नातेवाईकांनी सध्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध संशय अथवा तक्रार व्यक्त केलेली नाही.

दरम्यान, यापूर्वीही संबंधित विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या पूर्वीच्या घटनेशी संबंधित कागदपत्रे, जबाब आणि तपासातील बाबींचीही सद्य प्रकरणाच्या अनुषंगाने पडताळणी केली जात आहे.

मोबाईल, सीसीटीव्हीसह विविध बाबींची पडताळणी

प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थिनीकडे स्वतःचा मोबाईल फोन नव्हता. ती आवश्यकतेनुसार आई-वडिलांच्या मोबाईलचा वापर करत होती. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मोबाईलमधील उपलब्ध डिजिटल माहितीची पडताळणी केली जाणार आहे.

घटनास्थळाची पाहणी, पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

अभ्यासाच्या तणावाबरोबरच वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणती पार्श्वभूमी होती का, तसेच कोणाकडून त्रास, दबाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी बाब घडली होती का, याचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

दरम्यान, मृत विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.