मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : बारामती शहरातील गणेश मार्केट परिसरात पारंपरिक पद्धतीने भरविण्यात येणारा गुरुवारचा आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. हा निर्णय तात्काळ स्थगित करून आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी संघटनेने बारामती नगरपरिषदेकडे केली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह नरसिंगराव कदम यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. गणेश मार्केटमधील हा आठवडे बाजार अनेक वर्षांपासून सुरू असून, बारामती शहरासह परिसरातील शेतकरी येथे आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे या बाजाराचा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होत असल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले आहे.
बाजारामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण किंवा स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्यास बाजार बंद करण्याऐवजी त्यावर योग्य नियमन आणि पर्यायी व्यवस्था करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता आणि बाजारातील शिस्त याबाबत नगरपरिषदेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच आठवडे बाजार स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्यास शेतकरी आणि विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी. बाजार स्थलांतराची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने आणि संबंधित घटकांच्या हिताचा विचार करून राबवावी, असेही पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
आता नगरपरिषद प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि गणेश मार्केटमधील गुरुवारचा आठवडे बाजार पूर्ववत सुरू होणार का, याकडे शेतकरी आणि विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.
