भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; यज्ञो कंपनीजवळील घटनेने परिसरात हळहळ.
मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील एमआयडीसी परिसरात यज्ञो कंपनीजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञो कंपनीजवळील रस्त्यावरून दोन महिला दुचाकीवरून जात असताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोन्ही महिलांना मृत घोषित केले. मृत महिलांची नावे संगीता प्रदीप लोंढे (वय ३३) आणि मनीषा बबन शिंदे (वय ३३) अशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या पुणे जिल्ह्यातील सातारा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
अपघाताची तीव्रता मोठी.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चारचाकी वाहनाचा वेग मोठा असल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी दुचाकीचे तुकडे व वाहनाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, चारचाकी वाहनाचा वेग किती होता तसेच वाहनचालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणी.
या अपघाताची सखोल चौकशी करून दोषी वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास एस. एम. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, वाहनांची स्थिती, घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती संकलित केली जात आहे.
दरम्यान, बारामती एमआयडीसी परिसरातील या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संगीता लोंढे व मनीषा शिंदे या फलटण तालुक्यातील राजाळे गावच्या दोन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या एमआयडीसीतील ड्रीम प्लास्ट कंपनीत कामगार म्हणून काम करत होत्या..
