भोर-मांढरदेवी घाटात टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी; १५ ते २० भाविक सुखरूप

तीव्र उतारावर वाहनाचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती; मोठी जीवितहानी टळली

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

भोर : भोर-मांढरदेवी रोडवरील घाटात तीव्र उतारावर टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. शिरूर तालुक्यातील सुमारे १५ ते २० भाविक मांढरदेवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाटातील तीव्र उतारावर टेम्पो ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.