
मेकिंग महाराष्ट्र – पुणे : उच्चभ्रू प्रतिष्ठित व्यक्ती व उद्योजकांना जाळ्यात ओढून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रताप रमेश जाधव (वय 45) आणि पल्लवी प्रताप जाधव (वय 28, रा. भिंताडे नगर, राघव नगर, आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पोलिसांनी केली आहे.
प्रकरणाचा तपशील..
फिर्यादी महिला पतीपासून विभक्त राहतात. 2024 मध्ये त्यांचा आरोपी दांपत्याशी परिचय झाला. काही दिवसांनी फिर्यादी या दांपत्यासोबत राहत होत्या. दरम्यान, फिर्यादींनी आरोपींकडून दरमहा पाच टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. व्याज व मुद्दल मिळून त्यांनी सुमारे 3 लाख 7 हजार रुपये परत केले. तरीही आरोपींकडून सतत अधिक पैशांची मागणी होत होती.तक्रारीनुसार, 25 ऑगस्ट 2025 रोजी पल्लवी घराबाहेर गेली असताना प्रतापने फिर्यादीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांना अडवून ठेवत पैशांची मागणी केली. नकार दिल्यानंतर पल्लवीने प्रतापला पुन्हा अत्याचार करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रतापने पत्नीच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा अत्याचार करून त्याचे फोटो व व्हिडिओ काढल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.फिर्यादी आरोपींसोबत गोव्याला गेल्या असताना पल्लवीने त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये आरोपींनी फिर्यादीला बारामतीतील एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले व त्याबदल्यात सदनिका व 20 ते 25 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, फिर्यादींना प्रकाराची जाणीव झाल्यावर त्यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपींनी जीवितास धोका देण्याची धमकी देत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उलट 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल, तात्काळ अटक..
फिर्यादी महिलेने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, सावकारी अधिनियम व खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करून प्रताप व पल्लवी जाधव या दांपत्याला तात्काळ अटक केली.तक्रारीनुसार, पल्लवी ही उच्चभ्रू व प्रतिष्ठित व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांची कारवाईही..
कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक स्नेहा थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या पथकाने केली.पोलिसांकडून आरोपींच्या इतर गुन्हेगारी कारवायांचा तपास सुरू असून, अशाच प्रकारे ब्लॅकमेल करून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
