नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांचा बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा; राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जय पाटील यांचाही पदत्याग

मेकिंग महाराष्ट्र दि.१५ -बारामती शहराच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी बारामती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकाच वेळी दोन महत्त्वाच्या पदांवर राहणे टाळण्यासाठी तसेच प्रशासन आणि सहकार क्षेत्रात पारदर्शकता राखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक जय पाटील यांनीही बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नगरसेवक म्हणून शहर विकासाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्यांनी संघटनात्मक पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.शहराध्यक्ष पदाची धुरा हातात येताच जय पाटील यांनी शहरात कामाचा झंजावात सुरू ठेवला होता. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कामाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. युवकांचे संघटन मजबूत करत पक्षाला बळ देण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो बाटल्या रक्त संकलित करण्याचे काम केले. यामुळे शहरातील युवक आरोग्य सेवेसी जोडला गेला.रक्तदान शिबिराबरोबरच शहरात आरोग्य शिबिरे घेतली त्याला बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पाटील शहराध्यक्ष झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांनी राष्ट्रवादी शहर कार्यालय नव्याने बांधले.

त्यामुळे शहरात पक्ष संघटनेला ऊर्जेत अवस्था प्राप्त झाली. लोकसभा विधानसभेवेळी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढण्यास मदत झाली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राष्ट्रवादी पुन्हा हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये प्रभाग दौरे झाले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामती शहरात झालेली विकास कामे व भविष्यातील व्हिजन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर व तालुक्यातील कार्यकारणी बदलण्याचा घाट घातला गेला त्यानंतर देखील जय पाटील यांच्यावर अजित पवार यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवली. शहराध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी अनेक वेळा केला. असे असले तरी देखील कार्यकाळ संपल्याने आणि एकच वेळी या दोन्ही राजीनाम्यांमुळे बारामतीतील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, पक्ष व सहकारी संस्थांमध्ये लवकरच नव्या जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या निर्णयांचे स्वागत करण्यात येत असून, पुढील काळात शहर विकास आणि प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.