दगडांनी मारण्याच्या प्रयत्नातून मांडूळाचा जीव वाचवला; बारामती शहर पोलिसांची तत्पर धाव, वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त

वन्यजीवप्रेमीच्या सजगतेला पोलिसांची साथ; अंधश्रद्धा व संभाव्य गैरवापरापासून संरक्षित मांडूळ सर्पाची सुरक्षित सुटका

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती: बारामती शहरातील गिरीराज हॉस्पिटल परिसरातील रस्त्यावर मांडूळ जातीचा सर्प आल्याची माहिती वन्यजीवप्रेमी श्री. अभिजीत हराळे यांच्या निदर्शनास आली. त्या ठिकाणी काही नागरिकांकडून सदर सर्पाला दगडाने मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच श्री. हराळे यांनी तत्काळ बारामती शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस हवालदार श्री. ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस हवालदार श्री. यशवंत पवार यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रथम नागरिकांना सर्पाला इजा न करण्याबाबत समजावून सांगितले आणि परिस्थिती नियंत्रणात आणत मांडूळ सर्पाचे संरक्षण केले.

सदर सर्पाला कोणतीही इजा होणार नाही तसेच तो चुकीच्या व्यक्तींच्या ताब्यात जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत पोलिसांनी त्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आणले. पोलीस स्टेशनमध्येही त्याच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्यात आली.

मांडूळ अर्थात Red Sand Boa (Eryx johnii) हा जमिनीखाली तसेच मातीमध्ये वास्तव्य करणारा सर्प असून पर्यावरणीय साखळीत त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. शेत परिसरातील उंदीर व अन्य लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास अशा सर्पांचा उपयोग होत असल्याने मांडूळ हा शेतकऱ्यांसाठी आणि शेतीच्या नैसर्गिक परिसंस्थेसाठी उपयुक्त वन्यजीव मानला जातो.

मांडूळ सर्पाबाबत समाजात धनप्राप्ती, जादूटोणा, तांत्रिक विधी, गुप्तधन किंवा इतर अंधश्रद्धांशी निगडित अनेक चुकीचे समज प्रचलित आहेत. अशा अंधश्रद्धेमुळे या सर्पांची बेकायदेशीर पकड, खरेदी-विक्री, तस्करी किंवा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. प्रत्यक्षात अशा अंधश्रद्धांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.

बारामती शहर पोलिसांनी सदर सर्प सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाचे अधिकारी श्री. बनसोडे यांना तत्काळ पाचारण केले. श्री. बनसोडे यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन सदर मांडूळ सर्पाचा सुरक्षित ताबा स्वीकारला.

त्यानंतर आवश्यक काळजी घेत रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मांडूळ सर्पाला त्याच्या योग्य नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त केले. त्यामुळे रस्त्यावर जीव धोक्यात आलेल्या एका वन्यजीवाला पुन्हा त्याच्या नैसर्गिक वातावरणात सुरक्षितपणे सोडण्यात यश आले.

या संपूर्ण घटनेत वन्यजीवप्रेमी श्री. अभिजीत हराळे यांची सजगता, बारामती शहर पोलिसांची तात्काळ प्रतिसाद देण्याची कार्यपद्धती आणि वनविभागाशी साधलेला समन्वय यामुळे एका संरक्षित वन्यजीवाचा जीव वाचविण्यात आला. त्याचबरोबर अंधश्रद्धेमुळे किंवा चुकीच्या समजुतीतून वन्यजीवाला इजा होऊ नये, हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशही या कारवाईतून देण्यात आला.

“पोलीस कर्तव्य हे केवळ गुन्हे प्रतिबंध व कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित नसून नागरिक, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करणेही सामाजिक जबाबदारीचा महत्त्वाचा भाग आहे,” असा सकारात्मक संदेश बारामती शहर पोलिसांच्या या कारवाईतून पुढे आला आहे.

नागरिकांनी मांडूळ किंवा अन्य कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याला स्वतः पकडण्याचा, दगड मारण्याचा, इजा करण्याचा अथवा कोणत्याही व्यक्तीकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रसंगी तात्काळ वनविभाग किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अंधश्रद्धेवर विश्वास नको, वन्यजीवांचे संरक्षण करूया.

प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन