चेतन शिंदे – मेकिंग महाराष्ट्र
पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघाताचा प्रकार वाटत असलेल्या या घटनेच्या तपासात हत्या कटाचा संशय समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे.
या प्रकरणात केतन अग्रवाल यांची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. दोघांनी मिळून केतन यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात रितेश हांगे या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असल्याचे तपासात समोर आले असून, त्याला कथित कटाची माहिती होती का आणि या संपूर्ण प्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या तपासात डिलिट करण्यात आलेले WhatsApp चॅट्स रिकव्हर झाल्याचे समोर आले आहे. या चॅट्समधून आरोपींमधील संपर्क आणि या प्रकरणातील कथित कटाबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे वृत्त आहे.
18 जून 2026 रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र तपास पुढे जात असताना हा केवळ अपघात नसून हत्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू केली.
तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नेमका कट कसा रचण्यात आला, त्यामागील कारण काय होते आणि प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
केतन अग्रवाल प्रकरणातील तपासात आता आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
