बारामती नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे निवेदन

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असून, या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. किरण इंगळे ,बारामती नगरपरिषद स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती मा. नवनाथ बल्लाळ यांना निवेदन देण्यात आले.

नवीन ठेक्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सर्व बारामतीमधील कंत्राटी कामगारांना कामावर कायम ठेवण्यात यावे व कोणत्याही कामगाराला कमी करू नये, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. तसेच कामगारांना नियमानुसार किमान वेतन, पी.एफ., ESIS, बोनस आणि साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तत्कालीन ठेकेदारांनी कामगारांच्या पी.एफ. व ESISची रक्कम नियमाप्रमाणे भरली आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करावी. चौकशी करताना संबंधित कामगारांचे म्हणणे ऐकून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम परत देऊ नये आणि दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच बारामतीतील स्थानिक ठेकेदारांना ठेका मिळण्यासाठी नियम व अटी आवश्यकतेनुसार शिथिल करण्यात याव्यात, दर तीन महिन्यांनी कंत्राटी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

कामगार कामावर असताना वाहनाचा अपघात झाल्यास त्याचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये, तर संबंधित ठेकेदाराने तो खर्च करावा. प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप देण्यात यावी तसेच वेतन दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत अदा करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कंत्राटी कामगाराला कामावरून कमी करताना नियमानुसार तीन नोटिसा देण्यात याव्यात. कामाच्या कालावधीत कामगाराचा अपघात झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च ठेकेदाराने करावा तसेच उपचार व रजेच्या कालावधीतील वेतनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कामगारांच्या हक्कांशी संबंधित या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन नवीन कंत्राट प्रक्रियेत कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे यांच्यासह .
बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, सदस्य स्वप्निल लोंढे, शंकर शिंदे, रोहित कांबळे, नाना बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.