देशी दारूचे ३३ बॉक्स व गावठी हातभट्टीची दारू जप्त; दानेवाडीतील हातभट्टीही उद्ध्वस्त
मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
माळेगाव | प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात सुरू केलेल्या कारवाईला माळेगाव पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून देशी दारूचे ३३ बॉक्स, गावठी हातभट्टीची तयार दारू, मारुती सुझुकी अल्टो कार आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील दानेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टीही शोधून उद्ध्वस्त करण्यात आली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. पुणे जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी आणली जात असल्याने अशा दारू वाहतूकदारांची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
गोपनीय माहितीवरून पोलिसांनी रचला सापळा
या अनुषंगाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच पोलीस अंमलदार सरकारी वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेखर श्रीरंग पवार (वय २४, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा मोटारसायकल क्रमांक MH-16-AR-9083 वरून गावठी हातभट्टीची तयार दारू घेऊन येणार असून ती कैलास शंकर गव्हाणे (वय ३६, रा. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे) याला विक्री करण्यासाठी देणार आहे.
मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कारवाईचे आदेश प्राप्त करण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियोजनबद्ध पद्धतीने कऱ्हावागज चौक येथे सापळा रचला.
मोटारसायकलनंतर कार आली अन् पोलिसांचा संशय बळावला
सापळ्यादरम्यान गोपनीय माहितीतील मोटारसायकल कऱ्हावागज चौकात आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर काही वेळाने माळेगावकडून मारुती सुझुकी अल्टो कार क्रमांक MH-12-KT-0341 आली. कारमधून एक इसम खाली उतरला. त्याचवेळी मोटारसायकलवरील इसमाने काळ्या रंगाचा ड्रम अल्टो कारमध्ये ठेवला.
या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे शेखर श्रीरंग पवार आणि कैलास शंकर गव्हाणे अशी निष्पन्न झाली.
३३ बॉक्स देशी दारूसह चार लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनांची झडती घेतली असता देशी दारू टँगो पंच कंपनीचे एकूण ३३ बॉक्स, किंमत १ लाख १५ हजार ५०० रुपये, तसेच ३० लिटर क्षमतेचे दोन काळ्या रंगाचे ड्रम, त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू, किंमत ६ हजार रुपये, असा दारूसाठा आढळून आला.
याशिवाय ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो कार आणि २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH-16-AR-9083 असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ब. नं. २५५६ अमोल जालिंदर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २१५/२०२६, बी.एन.एस. कलम १२३, ३५(१) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
दानेवाडीतील गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त..
दरम्यान, आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी शोधून काढली. ही हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली असून, अवैध दारू निर्मितीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई..
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार विजय वाघमोडे तसेच पोलीस अंमलदार धीरज कांबळे, श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, सागर पवार, जयसिंग कचरे, सागर गायकवाड आणि होमगार्ड रमजान डांगे यांनी केली.
