पिंपळवंडी चिमुकली हत्या प्रकरण : सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन; कठोर कारवाईचे आश्वासन

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
पिंपळवंडी | २७ ऑगस्ट २०२६ | मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

धक्कादायक घटनेनंतर सुनेत्रा पवारांची पीडित कुटुंबाला भेट; शासन मदतीसाठी पुढे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज, २७ ऑगस्ट रोजी, पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

या घटनेने जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रयत्न..

या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले होते. तसेच आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पीडित कुटुंबाला शासनाचा आधार..

ताज्या वृत्तानुसार, पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून १० लाख रुपयांची मदत, घरकुलासाठी तरतूद तसेच पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपासाला वेग..

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना संशयास्पद बाबी आढळल्यानंतर तपासाची दिशा संशयित आरोपीकडे वळली. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, अशा अमानुष कृत्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना पिंपळवंडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

टीप : अल्पवयीन पीडितेची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती किंवा छायाचित्र प्रकाशित करण्यात आलेले नाही.