दहीहंडी सरावाचा नारळ संपन्न; यंदाचा उत्सव स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित

बारामती, दि. २५ ऑगस्ट २०२६ : ७५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा–बारामती यांच्या दहीहंडी सरावाच्या नारळाचा कार्यक्रम नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर भावपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव न करता त्यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरज सातव, मार्गदर्शक श्री. सदाशिव बापुजी सातव व श्री. दत्तात्रय काकाजी सातव, तसेच मंडळाचे आधारस्तंभ व बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री. सचिन सातव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी मंडळाच्या वतीने स्व. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून दहीहंडी सरावाच्या नारळाचा शुभारंभ करण्यात आला.

स्व. अजितदादा पवार यांचे श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मंडळाच्या विविध कार्यक्रमांना त्यांनी वेळोवेळी उपस्थिती लावत कार्यकर्त्यांचे कौतुक केले तसेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मंडळाच्या पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, मार्गदर्शन आणि बारामतीच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.”

दरम्यान, मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, ज्येष्ठ नेते मंडळी आणि सहकाऱ्यांमध्ये झालेल्या विचारविनिमयानंतर यावर्षी मंडळातर्फे कोणताही उत्सव अथवा आनंदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवाची ७५ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदा मात्र जल्लोषाऐवजी स्व. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यास मंडळाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दहीहंडी सरावाचा नारळ विधिवत पार पडला असला तरी यंदाचा उत्सव अत्यंत साधेपणाने आणि भावपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे.

“सदैव स्मरणात… आदरणीय दादा… स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!”

– अध्यक्ष, सर्व आजी-माजी पदाधिकारी व सदस्य
श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा – बारामती