प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल; आरोग्य संचालनालयातही धाव घेणार – नगरसेवक नवनाथ बल्लाळ.!

  • मेकिंग महाराष्ट्र – बारामती, प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आक्षेप घेत नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे संकलित करून आरोग्य संचालनालय, मुंबई येथेही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बल्लाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी बोलताना नवनाथ बल्लाळ म्हणाले की, रुग्णालय प्रशासनातील काही बाबी, निर्णयप्रक्रिया आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.बल्लाळ यांनी सांगितले की, केवळ स्थानिक पातळीवर तक्रार करून थांबणार नसून, संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावे संकलित करून आरोग्य संचालनालय, मुंबई येथेही सविस्तर तक्रार दाखल केली जाणार आहे. शासकीय रुग्णालयातील प्रशासन पारदर्शक आणि जनहिताभिमुख राहणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना अथवा अनियमिततेला खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.या प्रसंगी नगरसेवक बिरजू मांढरे, अभ्यंगत मंडळाचे सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामतीचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक समीर चव्हाण तसेच गौरव अहिवळे उपस्थित होते.दरम्यान, या तक्रारीमुळे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी आणि त्यातून पुढे काय निष्पन्न होते याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
    फोटो कॅप्शन :प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर माहिती देताना आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ. सोबत नगरसेवक बिरजू मांढरे, माजी नगरसेवक समीर चव्हाण, गौरव अहिवळे व अन्य उपस्थित.