
मेकिंग महाराष्ट्र – दि.४-बारामती शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत प्री-प्रायमरी शाळा, बोगस क्लासेस व तथाकथित स्कूल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती बारामती यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून संघर्ष माथाडी व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख दत्ता (दत्त) मालुसरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.


तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, बारामती शहर व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी कोणतीही शासकीय मान्यता नसताना प्री-प्रायमरी शाळा व क्लासेस संगनमताने सुरू आहेत. काही ठिकाणी केवळ शाळेचा बोर्ड लावून ‘क्लासेस’च्या नावाखाली प्रत्यक्षात शाळाच भरवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे इतर अधिकृत शाळांच्या दाखल्यांना जोडलेली असल्याचे प्रकार समोर येत आहेत.या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे भविष्यात गंभीर शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पालकांची आर्थिक फसवणूक होत असून, शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत प्री-प्रायमरी शाळा, क्लासेस तसेच ज्या अधिकृत शाळांमध्ये या विद्यार्थ्यांची नावे जोडलेली आहेत, त्या सर्व शाळांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व आवश्यक असल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेचे संपर्कप्रमुख दत्ता मालुसरे यांनी केली आहे.दरम्यान, या गंभीर प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनाही ई-मेलद्वारे तक्रार पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती, तक्रारदारांनी केलेल्या ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याचेही तक्रारदाराकडून सांगण्यात आले आहे.या प्रकरणामुळे बारामतीतील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, प्रशासन या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करते, याकडे पालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
