पिंपरी चिंचवड- शहरातील रिक्षाचालक तरुणाने पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर येथे घडली. रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित रिक्षाचालक तरुणानं आत्महत्या केली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी दिली.
राजू राजभर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पाच मिनीट २२ सेकंदाचा एक व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबत सविस्तर सांगितले आहे. तसेच दोन पानांची चिठ्ठीही लिहिली असून, त्यामध्ये आत्महत्या करीत असल्याबाबत नमूद केले आहे. तसेच आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफी मागितली आहे. मुलगी श्रावणीला सांभाळ, मम्मीला त्रास देवू नको, असे मुलगा गणेश याला उद्देशून म्हटले आहे. आपली व्यथा मांडणारा राजू यांचा व्हिडिओ मन हेलावून टाकणारा आहे. हा व्हिडिओ आणि चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.