मेकिंग महाराष्ट्र – बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका गंभीर व संतापजनक प्रकारात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून न्यायालयीन आदेशानुसार त्याला येरवडा केंद्रीय कारागृह येथे दाखल केले आहे.दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी देशमुख चौक परिसरात एका तरुणीचा (नाव गोपनीय – “निर्भया”) रस्ता अडवून आरोपी ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, ता. बारामती) याने तिची गाडी जबरदस्तीने थांबवून चावी हिसकावून घेतली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्वतःच्या घरी नेऊन मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या लज्जेस धक्का पोहोचविणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी (रिमांड) मंजूर करण्यात आली होती. पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडी (MCR) मंजूर झाल्याने आरोपीस येरवडा केंद्रीय कारागृहात रवानगी करण्यात आली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचविणे, अपहरण, मारहाण व जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
पोलीसांचा स्पष्ट संदेश:महिलांविरुद्ध कोणताही गुन्हा सहन केला जाणार नाही.सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा भोगावीच लागेल.बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची जरब कायम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास, छळ किंवा गुन्हा झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कारवाई तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्री उदय टापरे यांच्या कडून, माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
