पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत असतानाच पुण्यातही विजयादशमीच्या मुहूर्तावर पवार यांची सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सायंकाळच्या सभेपूर्वी सकाळी ही सभा होणार असल्याने पवार या सभेत काय बोलणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला दसऱ्यापासून सुरुवात होणार असून, या निमित्ताने पवार यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, आजपासून पुण्यातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे, तर नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार असून, नागपूर येथील सभाही पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
संघर्ष यात्रेनिमित्त कसबा पेठेतील लाल महाल, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंजपेठेतील महात्मा फुले वाडा या मार्गे पदयात्रा काढली जाणार आहे. संघर्ष यात्रेच्या पहिल्या दिवसाचा समोराप टिळक स्मारक मंदिर येथे होणार असून, त्या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
