पावसाचा धुमाकूळ: पुण्यात ४ जणांनी गमावला जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. अशातच पुण्यातील नदीपात्राच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून शहरात झालेल्या दुर्घटनांमध्ये चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात अंडा भुर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं दरड कोसल्यामुळे एका जणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुण्याजवळ असणाऱ्या लवासा इथं एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोणीही अडकले असल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. या दुर्घटनास्थळी बचावासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.