मेकिंग महाराष्ट्र – बारामती : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उद्या बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित राहणार असून,

पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.हा कार्यकर्ता मेळावा उद्या सकाळी साडेदहा वाजता पार पडणार असून, बारामती तालुक्यासह परिसरातील सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे.पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका, संघटनात्मक मजबुती, बूथस्तरावरील तयारी तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या मेळाव्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा निश्चित होणार असल्याने, या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
