मेकिंग महाराष्ट्र – आर्थिक व्यवहारातील पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण केलेल्या व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका करण्यात पाेलिसांना यश आले. तसेच हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) पहाटे हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. प्राजस दीपक पंडित (२५, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार
गुरुवारी (दि. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास ४ ते ५ जण घरी येत फर्निचरचे काम असल्याचे सांगत वडील हरिलाल रामखिलावन विश्वकर्मा यांना घेऊन गेले हाेते, असे योगेश हरिलाल विश्वकर्मा यांनी पोलिसांना सांगितले. मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी फोन करून घाबरतच उद्या सकाळी घरी येतो, असे सांगून फोन बंद केला. यामुळे योगेश यांनी नियंत्रण कक्षासह हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले व पथकाने हरिलाल विश्वकर्मा यांचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासात संशयित व्यक्ती वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होते. त्यानंतर पोलिसांना संशयित व्यक्ती खेड, शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी, नऱ्हे भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी हे अपहरण केलेल्या इसमासह कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्राजसला ताब्यात घेतले आहे.
