कामावरून काढले म्हणून पेट्रोल पंपच फोडला, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे: कामावरुन काढल्याने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड करण्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अकबर हुसेन तांबाेळी (वय ४२, रा. मंतरवाडी चौक, सासवड रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.पेट्रोल पंपमालक यशपाल नागोरी (वय ३७,रा. कल्याणीनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागोरी यांचा सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात कियांच पेट्रोल पंप आहे. आरोपी तांबोळी पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. कामावरुन काढल्याने तांबोळी चिडला होता.तांबोळी पेट्रोल पंपावर गेला. मला कामावरुन का काढले, अशी विचारणा करुन पेट्रोल पंपातील यंत्राची तोडफोड केली. पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तांबाेळी पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.