
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेनं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ एका कारमध्ये सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोण लगतच्या वाहनांपर्यंत पोहोचले. स्फोट आणि आगीचे वृत्त समजताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून घटनास्थळावरून गर्दी हटवण्यात येत आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. पोलिसांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
