बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा धडाका; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पदयात्रा

मेकिंग महाराष्ट्र – बारामती : प्रतिनिधी बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक रणधूमाळीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी काल काशीविश्वेश्वर मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर विविध प्रभागातही प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे.

आज बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करत मोठं शक्तीप्रदर्शन करत प्रभागातून पदयात्रा काढण्यात आली. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सचिन सातव यांना राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार जाहीर केली आहे. प्रशासकीय कामाबरोबरच विविध संस्थांवरील कामांचा अनुभव असलेल्या सचिन सातव यांनी कालपासूनच स्वत:सह सहकारी उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आज शहरातील विविध प्रभागांमध्ये सचिन सातव यांनी प्रचाराचा नारळ फोडत मतदारांच्या भेटी घेतल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, सुधीर सोनवणे, माळेगावचे संचालक नितीन सातव यांच्यासह विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव, प्रभाग क्र. १२, १३ व १४ मधील उमेदवार सारीका वाघमारे, अभिजीत चव्हाण, सुनीता बगाडे, बिरजू मांढरे, स्वाती अहिवळे, नवनाथ बल्लाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहभागी उमेदवारांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आलं. मोठ्या संख्येने नागरिक आणि महिलांनी या पदयात्रेत सहभागी होत विकासप्रिय राष्ट्रवादीला आपला पाठिंबा व्यक्त केला.