बारामती व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्री यांना निवेदन; व्यवसाय कर रद्द करण्याची मागणी

मेकिंग महाराष्ट्र – बारामती : येथील व्यापारी व उद्योजकांवर असलेला व्यवसाय कर हा अन्यायकारक आर्थिक भार ठरत असून तो तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी बारामती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांत अधिकारी मा. वैभव नावडकर यांना देण्यात आले असून ते मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, व्यवसाय करामुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग, व्यापारी तसेच लघुउद्योजक यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा कर व्यापाऱ्यांसाठी अडथळा ठरत असून त्याचा थेट परिणाम व्यवसायाच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे हा कर रद्द झाल्यास व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा व्यापारी महासंघाचा विश्वास आहे.व्यापारी महासंघाने सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर व्यापार-वाणिज्याला चालना मिळून आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या वेळी बारामती व्यापारी महासंघ चे अध्यक्ष सुशीलकुमार सोमानी, जगदीश पंजाबी, स्वप्निल मुथा, प्रशांत चांदगुडे, महेश ओसवाल, मनोज मुथा, प्रवीण आहूजा, सलीम तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.