डिसेंबरही सरासरीपेक्षा उष्ण राहणार;-यंदा कडाक्याची थंडी नाही.?

असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला…

पुणे : यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती कमी काळासाठी असेल. शिवाय डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. महापात्रा म्हणाले, यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कडाक्याची थंडी पडण्याची किंवा थंड लाटांची शक्यता कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती, कमी काळासाठी असेल. डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाचा नोव्हेबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी, तीन डिसेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याकडे झेपावेल. त्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान ढगाळ राहण्याची आणि हवेत आद्रर्तचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे

२०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण…
यंदाचे वर्ष हवामान शास्त्राच्या १७४ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक उष्ण ठरण्याचा अंदाज आहे. १८५० ते १९०० या काळातील सरासरी तापमानाच्या तुलनेत यंदा जागतिक तापमानात सुमारे १.४० अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरणार आहे. पण, आम्ही डिसेंबर महिन्यातील जागतिक तापमानाच्या नोंदींवर लक्ष ठेवून आहोत, असेही महापात्रा म्हणाले. दरम्यान, यंदा जुलै, ऑगस्ट, सप्टेबर आणि ऑक्टोबर महिनेही सरासरीपेक्षा उष्ण ठरले आहेत.