मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका;कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमापासून दूर 

बारामती : मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका घेत कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण पडू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले. ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाची सुरुवात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले.आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात सर्वत्र निदर्शने सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून राजकीय नेत्यांना काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन केले जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात अजित पवार हस्ते ऊसाची मोळी टाकून करण्यात येणार असल्याचे जाहीर होताच अजित पवार यांना बारामती बंदी करण्याचा इशारा देण्यात आला होता.कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विरोध करण्यात आला होता. हे ध्यानात घेऊन अजित पवार यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. अजित पवार येणार नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून अधिकृतरीत्या सागितले जात नाही तोपर्यंत  कार्यकर्ते जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.