मेकिंग महाराष्ट्र – पुणे : पत्नी टापटीप राहत नाही, तसेच ती दिसायला सुंदर नसल्याचे सांगून तिचा छळ करणाऱ्या एकाला कौटुंबिक न्यायालयाने तडाखा दिला. पत्नीने दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने निर्णय दिला असून, दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत एका महिलेने कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन पतीने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नी चांगली राहत नाही, तसेच दिसायला सुंदर नसल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. महिला पतीवर अवलंबून होती. उदरनिवार्हाचे साधन नसल्याने तिला पोटगी मिळावी, असा अर्ज ॲड. कांबळे यांनी न्यायालयात सादर केला.पती खासगी कंपनीत नोकरी करत असून, पत्नीकडे उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याची मागणी पत्नीने केली होती. पत्नी शिवणकाम, तसेच ब्युटीपार्लरचे काम करते. दरमहा मिळणाऱ्या वेतनातून आईचे उपचार केले जातात. घरखर्चाची जबाबदारी सांभाळावी लागते, असे पतीने न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकून पत्नीला दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले
