“अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार…”,संजय राऊतांचा हल्लाबोल..

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- दि २४. खासदार संजय राऊत यांनी ‘दसरा मेळाव्या’तून चौफेर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगण्याबाबत केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगू म्हणणारे अमित शाह महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेताय? असा सवालही संजय राऊतांनी यावेळी विचारला.

खासदार संजय राऊत म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अलीकडेच छत्तीसगडमध्ये गेले होते. त्यांनी तिथे सांगितलं की, छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटं लटकवू. अमित शाह असं छत्तीसगडमध्ये सांगतायत, अरे भाऊ मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेताय? छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवताय आणि महाराष्ट्रात काय करताय? भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवायची सुरुवात करायची असेल तर महाराष्ट्रापासून करा.”

“पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि २५ हजार कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा उल्लेख केला. मी अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार असं मोदीजी भोपाळमध्ये म्हणाले. त्यानंतर चार दिवसांनी अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अमित शाह म्हणतात भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटं लटकवू,” अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.